मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळावा यासाठी मराठी माणूस सातत्याने प्रयत्न करतो. वेळप्रसंगी आंदोलन, मोर्चाद्वारे रस्त्यावर उतरतो मात्र शहरातील राजकीय लोकप्रतिनिधी याबाबत मात्र उदासीन असल्याचे दिसून येते. शहरात वाढलेली इंग्रजी शाळा आणि कोचिंग क्लासेस ची मक्तेदारी मराठी भाषेची गळचेपी करू पाहत आहे. यावर पुढाऱ्यांचाच वरदहस्त असल्याने तरुण पिढी मराठी भाषेपासून दूर चालल्याचे प्रकर्षाने जाणवते . मराठी भाषा दिनाला केवळ मराठी असल्याचा बागुलबुवा करणाऱ्या शहरातील पुढार्यांनी विविध कार्यक्रम आयोजकांना मदत करणे तर सोडाच, साधी उपस्तितीहि दर्शविली नाही हे विशेष. यावरून त्यांचे मराठी भाषेवर किती प्रेम असल्याचे यावरून दिसून येते. केवळ मतांचे ध्रुवीकर आणि मी मराठी असल्याचा गाजावाजा करणाऱ्या पुढार्यांनी धार्मिकतेच्या जोरावर सत्तेसाठी मराठीपणाचा आव आणल्याचे दिसून येत आहे.
आज मराठी भाषा दिन असताना याबाबत जिल्ह्यातील लोकसभा, विधानसभा, विधानपरिषदेत मराठी भाषेचा मुद्दा उपस्तित करणारा एकही लोकप्रतिनिधी दिसून आला नसल्याने याबाबत मोठी शोकांतिका वाटते. विधानसभेचे अधिवेशन सुरु असताना शहरातील तारांकित प्रश्न तर सोडा पण ज्या भागाचे नेतृत्व हि राजकीय पुढारी करत आहेत त्या भागातील मराठी शिक्षणाचा दर्जा वाढविणारा एकही मुद्दा उपास्तीत करण्यासाठी आग्रही भूमिका घेताना दिसला नाही. राजकारणातील स्वार्थ आणि आपली सत्ता येण्यासाठी मतदारांसमोर पायघड्या घालणारा लोकप्रतिनिधी मी मराठी असल्याचा कांगावा करत आहे. औरंगाबादच्या ऐतिहासिक भूमीला संतांचा वारसा लाभला आहे. वारकरी संप्रदाय तसेच लोककलावंतानी मराठमोळ्या संस्कृतीला आणि त्याच बरोबर इथल्या मातीतल्या कलेला जिवंत ठेवले आहे मात्र या लोककलावंताची शासनदरबारी हेळसांड होत आहे.मराठी भाषा जोपासणाऱ्या या लोककलावंताच्या अनेक मागण्या शासनदरबारी धूळखात पडून असताना लोकप्रतिनिधींनी त्या मार्गी लावण्यासाठी कधीच तसदी घेतली नाही. निवडणूक आली कि केवळ पोकळ आश्वासने देऊन लोककलावंतांची बोळवण केल्या जाते. ज्या कलावंतांनी, शाहिर, साहित्यकांनी मराठी भाषेचा अभिजात दर्जा वाढविण्यासाठी योगदान दिले आहे. त्यांना आता या लोकप्रतिनिधींच्या कार्यालयात खेट्या मारून आपल्या चपला झिजवाव्या लागत आहे. औरंगाबादचे तर सोडाच संपूर्ण मराठवाड्यातील राजकीय नेतृत्वाकडे मराठी भाषेचा अभिजात दर्जा उंचावण्याची धमक नाही हे मराठी भाषेच्या अवस्थेवरून दिसून येते.
केवळ मराठी मालिका, चित्रपट, साहित्य तसेच लोककलेतून मराठी भाषा आणि कला जोपासणे आवश्यक नसून ते राजकीय पाटलावरही मांडता आले पाहिजे. याबाबत लोकप्रतिनिधींना केव्हा जाणीव होईल हे त्यांनाच माहित परंतु मराठी भाषेच्या संवर्धनासाठी या लोकप्रतिनिधींना धारेवर धरण्यासाठी मराठी माणूसच आग्रही भूमिका घेऊ शकतो. मराठवाडा हि संतांची भूमी आहे. संत एकनाथांनी वारकरी संप्रदायतुन आणि कीर्तनातून मराठी भाषेला ओळख निर्माण करून दिली. हि ओळख कायम राहावी यासाठी वारकऱ्यांनि मराठी भाषेची पताका सदैव फडकत ठेवली. कला, साहित्य, संस्कृतिक योगदानातून प्रत्येक मराठी माणसाने मराठी भाषेला जोपासले पाहिजे. मात्र त्याचबरोबर लोकप्रतिनिधींनीही हि आपली जबाबदारी, आणि कर्तव्य असल्याची भूमिका घेऊन मराठी भाषेचा दर्जा उंचावला पाहिजे यासाठी आग्रही होत मराठी भाषेला सन्मान मिळवून दिला पाहिजे तरच हा दिवस साजरा करणे सार्थक ठरेल.